सोशल मीडिया एक्स्पर्ट म्हणजे काय?
स्वतःला जे काही म्हणायचे आहे, ते म्हणणे नोंदविण्यासाठी आधी फक्त प्रिंट माध्यमाचा उपयोग केला जायचा; मात्र तंत्रज्ञानात जसे जसे बदल होत गेले, तसे प्रिंटबरोबरच डिजिटल मीडियाचा उपयोग होऊ लागला. आता तर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून एका क्षणात अनेक जणांपर्यंत पोचणे शक्य झाले आहे. सेलिब्रिटी व्यक्तींना सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून अपडेट राहायचे तर असते; मात्र त्यांच्याकडे तितका वेळ नसतो, त्या वेळी ते सोशल मीडिया एक्स्पर्टसची मदत घेतात. तसेच काही कंपन्याही आपली उत्पादने आपल्या चाहत्यांपर्यंत पोचविण्यासाठी सोशल नेटवर्किंग वेबसाइट्सचा आधार घेतात. त्यांना त्यांची उत्पादने आपल्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोचविण्यासाठीही सोशल मीडिया एक्स्पर्ट महत्त्वाची भूमिका बजावतो.
संधी कोणत्या ?
नामवंतांचे प्रोफाइल हाताळणे

ब्लॉगिंग
अनेक मान्यवर, लेखक हे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून वाचकांच्या भेटीला येत असतात. मात्र हे मान्यवर टेक्नोसॅव्ही असतीलच असे नाही. तेव्हा त्यांनी केलेले लिखाण हे ब्लॉगच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी ते सोशल मीडिया एक्स्पर्टसची मदत घेतात.
सोशल मीडिया मॅनेजर
कोणतीही माहिती अनेक जणांपर्यंत एका क्षणात पोचविता येते, हीच सोशल मीडियाची ताकद आहे. या माध्यमाच्या याच ताकदीचा उपयोग अनेक कंपन्या आता करत आहेत. अनेक कंपन्यांमध्ये सोशल मीडिया मॅनेजरची नेमणूकही केली जाते. सोशल नेटवर्किंग वेबसाइट्सच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांना जास्तीत जास्त हिट्स आणि लाइक्स मिळविणे, त्या उत्पादनाची जाहिरात करणे, हे यातील महत्त्वाचे टास्क असते.
इंटरनेट मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह
सोशल मीडियातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे इंटरनेट मार्केटिंग. हे मार्केटिंग करण्यासाठीही सोशल मीडिया एक्स्पर्टसची गरज लागते. उत्पादनासंबंधी टाकलेल्या पोस्टला लाइक मिळविणे, कंपन्यांचे फॉलोअर्स जास्तीत जास्त कसे वाढतील यासाठी स्ट्रॅटेजी ठरविणे, आलेले व्हिजिटर लीडमध्ये कसे कन्व्हर्ट होतील यासाठी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून प्रयत्न करणे, या गोष्टी यात येतात.
किती उत्पन्न मिळू शकते
सोशल मीडिया एक्स्पर्ट होण्यासाठी स्वतंत्र असा अभ्यासक्रम नाही. मात्र काही कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट छोटे छोटे क्रॅश कोर्स चालवितात. या कोर्सेसमधून सोशल नेटवर्किंग वेबसाइट्स कशा ऑपरेट करायच्या याची प्राथमिक माहिती मिळू शकते. मात्र सध्याच्या युगात प्रत्येकाचे फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट असते. अनेक जण स्वतःचे ब्लॉग्जही चालवितात. त्यामुळे ज्यांना हे तंत्र अवगत आहे, त्यांच्यासाठी ही नवीन गोष्ट नाहीच. फेसबुक आणि ट्विटरवर कायम ऑनलाइन असणाऱ्यांनी या साइट्सकडे पैसे कमाविण्याचे माध्यम म्हणून पाहिले तर शिकता शिकताही त्यांना रोज दोन ते तीन तास काम केल्यावर सहज 10-15 हजारांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. पूर्ण वेळ करिअर म्हणूनही याकडे पाहता येऊ शकते. कारण सध्या या क्षेत्रात पूर्ण वेळ काम करणारी मंडळी कमी आहेत. पुढच्या काही वर्षांत प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग म्हणूनच सोशल मीडियाकडे पाहिले जाईल. त्यामुळे लॉंग लाइफ बिझनेस म्हणूनही यात संधी आहे.
आवश्यक कौशल्ये
प्रामाणिकपणा
विश्वास जपणे, ही या क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण नामवंत व्यक्तींचे प्रोफाइल तुम्ही हाताळत असता, तसेच विविध कंपन्यांचे ब्रॅंडिंगही तुमच्या सोशल मीडिया एक्स्पर्टसच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे तुमच्या क्लायंटची "इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीच' सोशल मीडिया एक्सपर्ट या नात्याने तुमच्याकडे असते. त्यामुळेच विश्वास जपणे, हीच यातील महत्त्वाची बाब असते.
रोज अपडेट राहण्याची तयारी
तंत्रज्ञानात दिवसागणिक बदल होत असतात. त्यामुळे या क्षेत्रात यायचे असेल तर रोज नवे शिकण्याची तुमची तयारी हवीच. या क्षेत्राचा वेगही जास्त असल्यामुळे तुम्हाला रोजच स्वतःला सिद्ध करावे लागते.
आवडीनिवडीची पारख
लोकांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यानुसार तुम्हाला त्यांच्याशी डायलॉग क्रिएट करता आला पाहिजे, हेच या क्षेत्रातील मुख्य कौशल्य आहे.
विविध विषयांतलं ज्ञान
सोशल मीडिया एक्सपर्ट म्हणून काम करताना तुमचे क्लायंट हे वेगवेगळ्या विषयांतले असू शकतात. त्यामुळे त्यांच्या क्षेत्रातलं ज्ञान तुमच्याकडे हवंच, नसल्यास ते मिळविण्याचीही तयारी हवी.
आयुष्याचा ट्रॅक बदलला ः सागर नांगरे
खरं तर मी या क्षेत्रात येईन असे मलासुद्धा वाटले नव्हते. मी इंजिनिअरिंग करत होतो. माझे इंजिनिअरिंगचे काही विषय राहिले त्यामुळे मी त्याचा अभ्यास करत होतो. तो सुरू असतानाच माझा मित्र मंगेश हाडवळे याने "टिंग्या' हा चित्रपट बनविला. या चित्रपटाचे प्रमोशन वेबसाइट्सच्या माध्यमातून कसे करता येईल याबाबत त्याच्याशी चर्चा झाली, तेव्हा मी "टिंग्या' चित्रपटाचा ब्लॉग केला. त्यावर चित्रपटाबद्दलचे अपडेट पोस्ट करत गेलो. या अशा पद्धतीच्या प्रमोशनला चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्यानंतर माझा इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरू असतानाच मी ब्लॉगिंग या क्षेत्रात आलो. टिंग्याचे काम चांगले झाल्यामुळे आणखी एका चित्रपटाची मला ऑफर आली. हे काम झाल्यानंतर मी पैसे मिळविण्याच्या दृष्टीने काम शोधत होतो. तेव्हा असे वाटले, की आपल्याला हे जमते आहे, तर याच क्षेत्रात काम करावे. त्यामुळे मी फ्री लान्सिंग पद्धतीने काम सुरू केले. हे ठरविण्यापर्यंत माझी या क्षेत्रातली इन्व्हॉल्वमेंटही वाढलेली होती. त्यानंतर मी शिक्षण, ज्वेलरी, चित्रपट, ऑटोमोबाईल अशा क्षेत्रांतील विविध कंपन्यांच्या निरनिराळ्या प्रोजेक्ट्सवर काम केले. यात इंटरनेट मार्केटिंग, सोशल मीडिया कन्सल्टंट म्हणून काम पाहिले. सध्या मी क्लब हॅकसाठी काम करीत आहे. येत्या काही वर्षांतच स्वतःची सोशल मीडिया कन्सल्टिंग फर्म काढण्याचा माझा विचार आहे. एक मला सांगावेसे वाटते, की मी ठरवून इंजिनिअरिंगकडे वळलो होतो; मात्र अजूनही माझे इंजिनिअरिंग पूर्ण झालेले नाही; पण सोशल मीडियामुळे माझ्या आयुष्याचा ट्रॅकच बदलून गेला आहे.
हा लेख जून २०१३ च्या कॅरीअर विशेष साप्ताहिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झाले होते.
स्त्रोत : http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20130614/5717070800577033300.htm
Sign up here with your email